आनंद महिंद्रांनी नटराजनला दिलेला शब्द पाळला; केली शानदार महींद्रा थार गिफ्ट

 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गोलंदाज टी नटराजनने शानदार प्रदर्शन केल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्याला कार गिफ्ट देण्याची घोषणा केली होती, आता महिंद्रा यांनी आपला शब्द पाळला असून त्यांनी नटराजनला एक नवी कोरी कार गिफ्ट दिली आहे.

भारताचा गोलंदाज नटराजन याने आयपीएल २०२० मध्ये शानदार प्रदर्शन केले होते, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघात घेतले होते. तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुद्धा त्याने चांगली कामगिरी करून दाखवली होती.

नटराजनच्या कामगिरीमुळे आनंद महिंद्रा चांगलेच खुश झाले होते, त्यामुळे त्यांनी एक गाडी देण्याची घोषणा केली होती, आता तोच शब्द पाळत महिंद्रा यांनी नटराजनला थार गाडी भेट म्हणून दिली आहे.

नटराजनने सुद्धा गाडी भेट म्हणून मिळाल्यानंतर आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांना एक रिटर्न गिफ्ट पण दिले आहे. ब्रिस्बेन टेस्ट सिरीजची नटराजनने स्वतः परिधान केलेली जर्सी त्याने महिंद्रांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिली आहे.

भारतीय संघासाठी खेळणे हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे. मला चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी चांगले प्रदर्शन करू शकलो, आज महिंद्रा यांचे गिफ्ट स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझे कौतुक केले आहे, असे ट्विट नटराजनने केले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.