३३ वर्षापुर्वी अयोध्येतील राममंदीरासाठी चांदीची विट पाठवणारा शिवसेनेचा ढाण्या वाघ आनंद दिघे

प्रचंड वाद-विवाद झाल्यानंतर अयोध्यामध्ये शेवटी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले.

एकंदरीतच काय तर या सगळ्या वादाला आता पूर्णविराम लागला. मात्र हे सगळं भूमिपूजन करत असताना एक गोष्ट बहुचर्चित आली ती म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवलेली चांदीची विट.

ही विट नरेंद्र मोदींनी अयोध्येतील प्रभु श्रीरामचंद्राच्या चरणी अर्पणही केली. मात्र अशीच एक विट मंदिर बनावायच्या ही आधी ३३ वर्षापूर्वी बनवण्यात आली होती.

कोणी बनवली होती ही विट आपल्याला माहिती आहे का? नाही ना, चला तर मग पाहूया आयोध्येला ३३ वर्षापूर्वी पाठवलेल्या चांदीच्या विटेचा इतिहास.

१९८७ साली महाराष्ट्रातील ठाणे या शहरातून पहिली चांदीची विट अयोध्या येथे पाठवण्यात आली होती. ही पहिली विट पठवणारा ढाण्यावाघ म्हणजे ठाण्यातील त्याकाळचे शिवसेनेचे अध्यक्ष धर्मवीर आनंद दिघे.

बाळासाहेब ठाकरे यांचा पहिल्यापासूनच उघड पाठिंबा राम मंदिर निर्माणासाठी होता. त्यामुळे कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तसेच बाबरी मज्जिद पाडण्याच्या पाच वर्षे आधी, आनंद दिघे यांनी त्याच जागी मंदिर निर्माण करण्यासाठी पहिली चांदीची विट बनवून घेतली.

ही विट पूर्णतः चांदीची बनवलेली होती. व त्यावर जय श्रीराम असेही लिहिण्यात आले होते. आणि या विटेचे वजन तब्बल सव्वा किलो इतके होते.

टेंभी नाका येथे असलेल्या कनुभाई या दागिन्यांच्या व्यापाऱ्याकडून आनंद दिघेंनी ही विट बनवून घेतली होती. विट बनवून घेतल्यानंतर ही विट नवरात्रोत्सवात पूजनासाठी आणण्यात आली. पुढे ही चांदीची विट पूजा करून कारसेवकांच्या मार्फत अयोध्येला पाठवण्यात आली.

मात्र लोकांचा उत्साह पाहून चंदनाचे लाकूड वापरून त्यावर चांदीचा मुलामा देऊन याच खऱ्या चांदीच्या विटेची आणखीन एक प्रतिकृती बनविण्यात आली होती.

या चांदीचा मुलामा दिलेल्या विटेची प्रतिकृती ठाण्यातील टेंभी नाका येथे सात दिवस ठेवण्यात आली होती. या विटेचे पूजन गजानन पट्टेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते.

यावेळी अनेक ठाणेकरांनी या विटेसाठी स्वतःच्या घरातील पैसा, चांदी दान स्वरूपात देखील दिले होते. या विटेसोबतच आनंद दिघे यांनी ५१ फुटी नामाचे प्रतिकृती टेंभी नाका येथे उभारली होती.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.