अमित ठाकरे (Amit Thackeray): राज्याच्या राजकारणातील उलथापालथीनंतर सगळीकडेच वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. प्रत्येकजण राजकारणात सक्रीय होण्याच्या तयारीला लागले आहेत. यातच आता मनसे नेते अमित ठाकरेदेखील मैदानात उतरले आहेत. पक्षसंघटना वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत. यादरम्यान ते सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच त्यांचा उत्साह वाढवण्याचे काम करत आहेत. आपला पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासोबतच आगामी निवडणुकांबद्दल बोलताना त्यांनी मनसैनिकांना विविध सूचना दिल्या आहेत.
आगामी निवडणुकांविषयी बोलताना “येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहोचवू. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
तसेच त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा,” असे अमित ठाकरे मनसैनिकांना म्हणाले.
यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरु केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का? एवढाच माझा एक प्रश्न आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, असे अमित ठाकरे म्हणाले.