Ambernath Accident : शिवसेना उमेदवाराच्या गाडीची भीषण धडक, अंबरनाथमध्ये चौघांचा मृत्यू; किरण म्हणाल्या, ड्रायव्हरला फोन आला आणि त्याचा पाय…

Ambernath Accident : अंबरनाथ येथील उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने समोरून येणाऱ्या दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक बसली. धडकेनंतर कार उलटली आणि काही क्षणांतच परिसरात भीमा निर्माण झाला. या अपघातात कार चालकासह तीन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, कार चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याचा पाय अ‍ॅक्सिलरेटरवर दाबलेल्या अवस्थेत अडकून राहिला आणि वाहन अनियंत्रितपणे पुढे धावत राहिले. ही कार शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नगरपरिषद निवडणुकीतील महिला उमेदवार किरण चौबे (Kiran Chaube) यांची होती. त्या सभेसाठी जात होत्या आणि या अपघातात त्या स्वतःही जखमी झाल्या आहेत.

शुक्रवारी सायंकाळी किरण चौबे अंबरनाथच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्या कारने जात होत्या. उड्डाणपुलावर पोहोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जबरदस्त धडक दिली. एक दुचाकीस्वार थेट पुलाखाली फेकला गेला, तर इतरांना तातडीने मदत करण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली.

पोलिसांच्या माहितीनुसार, चालकाचा पाय अ‍ॅक्सिलरेटरवर अडकून राहिल्याने गाडीचा वेग अनैसर्गिकरीत्या वाढला होता. त्यामुळे अपघात टाळणे अशक्य झाले.

किरण चौबे यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात सांगितले की, “उड्डाणपुलावर जात असताना कार चालक लक्ष्मण शिंदे (Laxman Shinde) यांना फोन आला. ते बोलत होते, पण अचानक त्यांनी बोलणे थांबवले. आम्ही विचारण्याआधीच त्यांच्या पायाने अ‍ॅक्सिलरेटर जोरात दाबलेले दिसले. गाडी अनियंत्रित झाली, वेग वाढला आणि क्षणातच अपघात घडला.”

या दुःखद अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला. लक्ष्मण शिंदे (Laxman Shinde) कार चालक, शैलेश जाधव (Shailesh Jadhav)  अंबरनाथ महापालिका कर्मचारी, चंद्रकांत अनारके (Chandrakant Anarkhe) अंबरनाथ महापालिका कर्मचारी, सुमीत चेलानी (Sumit Chelani) १७ वर्षीय युवक या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर उड्डाणपूल, कल्याण व बदलापूर या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून तपास सुरू होता.