Raj Thackeray Uddhav Thackeray: मुंबई (Mumbai) येथील एनएससीआय डोम (NSCI Dome) मध्ये ५ जुलै रोजी झालेल्या मराठी जल्लोष मेळाव्याने महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात नवीन चर्चा सुरू केल्या. मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल २० वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. उद्धव ठाकरे यांनी या मंचावरून “आता आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत,” असे स्पष्टपणे सांगून युतीच्या संकेतांना बळ दिले.
मात्र, दुसरीकडे राज ठाकरे यांनी मात्र युतीबाबत फारसा स्पष्टपणा दाखवलेला नाही. याउलट त्यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना युतीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिल्याशिवाय, सार्वजनिकरित्या बोलू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. “माझी परवानगी घेण्याआधी कोणीही युतीवर वक्तव्य करू नये,” अशी सक्त ताकीद त्यांनी दिली आहे.
वाढलेला संभ्रम
या आदेशामुळे शिवसेना आणि मनसे (MNS) यांच्यात युती होणार की नाही, याबाबत नव्याने संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी या दोन पक्षांच्या युतीच्या चर्चांना वेग आला होता. कारण एकाच व्यासपीठावर ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. तेव्हाच या युतीच्या शक्यतेबाबत चर्चेला सुरुवात झाली होती.
उद्धव ठाकरेंचा विश्वास, राज ठाकरेंची सावध भूमिका
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक वेळा राज ठाकरेंबरोबरच्या भावनिक नात्याचा उल्लेख करत युतीबाबत सकारात्मकता दर्शवली होती. त्यांच्या बोलण्यातून राज ठाकरे यांच्याशी युती करण्याची तीव्र इच्छा दिसून आली. मात्र राज ठाकरे (Thackeray) यांनी स्वतः युती संदर्भात फार काही भाष्य न करता एकप्रकारे ‘वेट अॅन्ड वॉच’ (wait and watch) भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
राज ठाकरेंची भूमिका निर्णायक
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, “मराठी माणूस एकत्र यायला हवा, आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न पूर्ण व्हावे,” असे भावनिक आवाहन केले. पण त्यांनी युतीबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केला असला, तरी अंतिम निर्णय हा राज ठाकरे यांच्यावरच अवलंबून असणार आहे.
पुढचे पाऊल कोणते?
सध्या तरी शिवसेना आणि मनसे युतीबाबत कोणताही औपचारिक निर्णय झालेला नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनंतर, त्यांच्या पक्षातील कोणताही पदाधिकारी युतीबाबत बोलणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असले, तरी त्यांच्या पक्षांची राजकीय युती होईल की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.