Amit Shah On Opration Sindhoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याला जबाबदार असलेल्या तिघा दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी अखेर कंठस्नान घातले. हे ऑपरेशन महादेव (Mahadev) अंतर्गत राबवण्यात आलं असून, याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेत दिली.
तिघांचा खात्मा, महत्त्वाची शस्त्रे जप्त
गृहमंत्र्यांनी सांगितलं की, पहलगाममधील हल्ल्यामध्ये सहभागी असलेले सुलेमान (Suleman), जिब्रान (Jibran) आणि अफझल (Afzal) हे तिन्ही दहशतवादी ठार झाले. जम्मू-काश्मीर पोलिस (J&K Police), सीआरपीएफ (CRPF) आणि भारतीय सैन्याच्या संयुक्त कारवाईत हा यशस्वी निकाल लागला. दहशतवाद्यांकडून तीन रायफल आणि हल्ल्यात वापरलेली अन्य शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
तपासात उघड झालं की, या तिन्ही दहशतवाद्यांनीच पहलगाम हल्ला घडवून आणला होता. त्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली असून, त्यांनीही मृत दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. आज (29 जुलै) पहाटे सुमारे 4 वाजता ही ओळख निश्चित झाली.
सीसीएस बैठकीतील महत्त्वाचा निर्णय
हल्ल्यानंतर गृहमंत्री तात्काळ श्रीनगरला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 23 आणि 24 एप्रिल रोजी सुरक्षा विषयक सीसीएस (CCS) बैठक झाली. या बैठकीत सिंधू नदी करार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि दहशतवाद्यांना तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचं ठरलं. 30 एप्रिलच्या सीसीएस बैठकीत सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं.
7 मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindhoor) मध्ये नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत अनेक महत्त्वाचे दहशतवादी ठार झाले किंवा लपून बसलेली ठिकाणं उद्ध्वस्त झाली.
हल्ल्याचा थरकाप उडवणारा दिवस
22 एप्रिल 2025 रोजी पहलगामपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन घाटी (Baisaran Valley) येथे तिन्ही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला. लोकांची धार्मिक ओळख विचारून पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. या निर्दयी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.






