छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अलका कुबल यांनी मागितली माफी

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांचे वाद वाढतच चालले आहेत. अलका कुबल यांनी प्राजक्तावर काही आरोप केले आहेत. या आरोपांविषयी मुलाखतीत बोलताना त्यांच्या तोंडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. याचसंदर्भात आता अलका कुबल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये त्या हात जोडून माफी मागताना दिसत आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अलका कुबल यांनी जाहीर माफी मागितली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी माफी मागितली आहे. एका मुलाखतीत अलका कुबल यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेविषयी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता.

“आमच्या मालिकेचा जो वाद सुरू होता, त्याबद्दल मी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. अनवधानाने माझ्या तोंडून एकेरी उल्लेख निघाला याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते”, असे अलका कुबल या व्हिडीओत म्हणाल्या.

अलका कुबल यांनी प्राजक्ताला उघडपणे खडेबोल सुनावले. पण ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेचा उल्लेख एकेरी केल्याने त्यांच्यावर टीका होताना दिसतेय. तसेच प्राजक्ताच्या चाहत्यांनी सोशल मीडिया #isupportprajkata ही मोहिम सुरू केली असून विवेक सागंळे आणि अलका कुबल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.