Akkalkot : गावाकडं नातवंडं म्हणजे घराचा गोडवा, आनंदाचा झरा. आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबांना नातवंडं अधिक लाडकी असतात. त्यांच्या खेळण्यामधून, गप्पांमधून, लाडातून सारा संसार उजळतो. पण अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात अशी एक हृदयद्रावक घटना घडली की, गावभर हळहळ व्यक्त होतेय. इथे नातवाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, त्याचं सरण पाहून आजीच्या जीवावरही बेतलं.
एका दिवसात दोन मृत्यू, कुटुंब उद्ध्वस्त
हन्नूर (Hannur) गावातील व्हनमाने कुटुंबावर काळाने मोठा आघात केला. एकुलता एक नातू गमावल्यानंतर थोड्याच वेळात घरातील ज्येष्ठ माऊलीनंही प्राण सोडले. अचानक दोन अंत्यविधींचा सामना करताना कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघातात 9वीत शिकणाऱ्या नातवाचा मृत्यू
शाळा सुटल्यावर घरी परतण्यासाठी सोय नसल्याने, आदित्य व्हनमाने (Aditya Vanmane) या नववीत शिकणाऱ्या मुलाने गावाकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. दुचाकीवर बसून तो घरी जात असताना अचानक एका कारचालकाने धडक दिली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला, मात्र मागे बसलेला आदित्य जागीच ठार झाला. चपळगावातील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात तो शिकत होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
नातवाचं सरण पाहून आजीला आला हृदयविकाराचा झटका
आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत आणला गेला. तिथे शोकाकुल वातावरणात कुटुंबीय आक्रोश करत होते. यावेळी त्याची आजी जनाबाई व्हनमाने (Janabai Vanmane) मृतदेह पाहून कोसळली. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. नातवाचा मृतदेह पाहून त्या जग सोडून गेल्या, हे पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं.
एकाच स्मशानभूमीत आजी-नातवाला निरोप
सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ही घटना होती. रडत्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी दु:ख दाबून, आजी-नातवाचा एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला. गावभर हळहळ व्यक्त होत असून, ही घटना ऐकून प्रत्येकाचं हृदय पिळवटून निघालं आहे.