Share

Ajit Pawar: मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर निशाणा

Ajit Pawar: सोलापूर (Solapur) येथील वडाळा परिसरातील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. अनगर नगरपंचायत (Angar Nagarpanchayat) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी दिलेली ही प्रतिक्रिया मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीवर अनेक वर्षे सत्ता गाजवणारे राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या नगरपंचायतीतील 17 जागा त्यांनी यापूर्वी बिनविरोध जिंकल्या होत्या. मात्र, यंदा नगराध्यक्षपदासाठी पाटलांची सून उमेदवार असताना, अजित पवार गटाकडून उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा अर्ज भरूच देऊ नये म्हणून दडपशाही झाल्याची चर्चा होती. अखेर तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज बाद केला.

अर्ज बाद झाल्यानंतरही उज्वला थिटे यांनी आपला संघर्ष थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर सोलापूरमधील कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाषणात अजित पवारांनी राजन पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.

पवार म्हणाले की, “लोकशाहीत सर्वांनाच निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार आहे. दमदाटी करून कुणाचं काही चालत नाही. प्रत्येकाचा फुगा एक दिवस फुटतोच. मस्ती करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं.” ते पुढे म्हणाले, “गावातील परिस्थिती तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आमच्या बहिणींचं संरक्षण करण्यासाठी आम्ही नेहमी उभे राहिलो. पुढच्या निवडणुकीत चांगल्या विचारांचे लोक पुढे यायला हवेत.”

महिलांविषयी बोलताना पवार म्हणाले, “उज्वला ताई, आम्ही नेहमी महिलांचा सन्मान केला आहे. महिलांना संधी दिली तर त्या सोनं घडवतात. पवार साहेबांनी महिलांसाठी 50% आरक्षणाची सुरुवात केली आणि आम्ही त्यात भर घातली. याच विचारातून ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी शासन 45 हजार कोटी रुपयांचा निधी राज्यभर वितरित करत आहे.” अजित पवारांच्या या भाषणामुळे अनगरमधील राजकीय समीकरणांना नवा कलाटणी मिळाल्याचं मानलं जात आहे.

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now