अजित पवार यांनी वाहिली दत्ता साने यांना श्रद्धांजली; म्हणाले…

 

पिंपरी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादीचे धडाकेबाज नगरसेवक दत्ताकाका साने यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान त्यांच्या विषयीच्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले.

महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे.

संघटनेची ध्येयधोरणे तडफेने राबविणाऱ्या या झुंजार कार्यकर्त्याची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहातील तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांचं योगदान कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल”.

लॉकडाऊन काळात साने यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप केले होते. त्यावेळी त्यांचा अनेक नागरिकांशी थेट संपर्क आला होता.

२५ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.