Share

Ajit Pawar NCP: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीदेखील पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा

Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Group) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादात, पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांना इशारा दिला आहे. पक्षाने आमच्या भावना दुर्लक्षित केल्या, तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट आणि थेट इशारा गारटकर यांनी इंदापूरातून दिला आहे.

इंदापूरच्या नगराध्यक्ष पदावरून तापलेलं राजकारण

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी ठरवताना, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा (Bharat Shah) यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात घेऊन थेट उमेदवारी देण्यात आली. मात्र, या निर्णयाला जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

गारटकरांचा ठाम इशारा 

पक्षाच्या निर्णयाविरोधात गारटकर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर, इंदापुरातील आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ठाम भूमिका मांडत सांगितलं की, “जर पक्षाने आमच्या मतांचा सन्मान केला नाही, तर मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मी वाट बघेन, त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेईन.”

प्रदीप गारटकर पुढे म्हणाले, “जर पक्षाने योग्य सन्मान दिला तर आम्ही घड्याळावरच राहू. पण जर आम्हाला कोललं, तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही. माझी सगळ्यांशी बोलणी सुरू आहेत, आणि जर स्थानिक ताकद एकत्र आली तर ही निवडणूक एकतर्फी होईल, एवढी मी खात्री देतो.”

स्थानिक स्तरावर वाढलेला असंतोष

इंदापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या गटांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला जिल्हा पातळीवर आव्हान देणारी ही पहिलीच सार्वजनिक प्रतिक्रिया मानली जाते. गारटकर यांची नाराजी उघड झाल्यानंतर, पक्षांतर्गत वातावरण अधिक ताणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गारटकरांनी अखेरच्या टप्प्यावर पक्षाशी भूमिका स्पष्ट केली आहे. “आमचं मनोबल तोडू नका, अन्यथा आम्ही आमचा मार्ग वेगळा करू. माझं पद आणि पक्ष नातं सन्मानावर टिकलेलं आहे. जर तो सन्मान राहिला नाही, तर निर्णय वेगळा घ्यावा लागेल,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now