Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यात ते बोलत होते.
या वेळी त्यांनी बारामतीकरांसाठी केलेल्या आपल्या कामाची आठवण करून देताना, “बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही. बाकीच्यांचा घास नाही घास. मला लोकांनी लाखापेक्षा जास्त मतं दिली आहेत,” अशी टोलेबाजी केली.
त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर भाष्य करत सांगितले की, “कॅनलमधून पाणी न देता बंद पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे मी बोललो की, लगेच टीव्हीवर दिसते, पण मला दुसरीकडे त्रास होतो.” त्याचवेळी त्यांनी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “हे सरकार पाच वर्षे चालणार आहे.”
तसेच, अजित पवार यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनी सांगितले की, “कारखान्याचा इन्कम टॅक्स फक्त अमितभाईमुळे निघाला,” आणि “कारखान्याचे काम आधी का केले नाही?” अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांना लक्ष करत त्यांचे मत मांडले.
अजित पवार यांनी बारामतीकरांना विश्वास दिला की, “मी तुमच्या प्रपंचावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही. तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या मतांची मला खूप गरज आहे.”
याशिवाय, त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना, “आपल्याला गरिबांसाठी मोठ्या हॉस्पिटलच्या जागा राज्य सरकारच्या अखत्यारीत दिल्या आहेत,” अशी माहिती दिली. तसेच, ते म्हणाले की, “आपल्या पाठिंब्यामुळेच कारखाने पुढे जाऊ शकतात.”
अजित पवार यांनी उपस्थितांना आवाहन करत सांगितले की, “पुढील पॅनल काय होईल, हे माहित नाही, परंतु जशी तुम्ही मला आजपर्यंत साथ दिली आहे, तशीच साथ मला भविष्यातही द्यावी.”