Ajit Pawar : राज्याचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायरीवर उभे राहून घोषणाबाजी करत विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आजचा दिवसही चांगलाच गाजवला.
विरोधकांनी अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कायदा सुव्यवस्था या विषयांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. शिंदे गटातील बंडखोर आमदारांना अजित पवार यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी नुकतेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्यावर अजित पवारांनी निशाणा साधला.
महाविकास आघाडीचे आमदार राज्य विधिमंडळ अधिवेशाच्या पहिल्या दिवशी “५० खोके सगळं ओक्के” अशा घोषणा देत आक्रमक झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही त्यांनी “गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी,” अशा घोषणा देत शिंदे गटातील आमदारांना डिवचले. तसेच त्यांनी सभागृहाच्या आतमध्येदेखील सत्ताधाऱ्यांना चांगलेच कात्रीत पकडले.
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. मात्र, यानंतर पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा प्रश्न अजित पवारांनी तानाजी सावंतांना विचारला. तानाजी सावंत यांना याबाबत माहिती नसल्याने ते शांत बसले.
त्यांनतर अजित पवार ओल्या दुष्काळाबाबत बोलत असताना त्यांना मधेच थांबवत “दादा यावेळी राज्यात पाऊस चांगला झालाय” असे शंभूराज देसाई म्हणाले. त्यामुळे अजित पवार संतापले व त्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. शंभुराज मध्ये बोलायचं नाही. आपण एकत्र काम केलंय, मध्ये बोलायचं नाही हे माहिती नाही का? असे म्हणत अजित पवार यांनी शंभूराज देसाईंना गप्प केले. तसेच सगळीकडे ओला दुष्काळ पडलाय आणि पाऊस जास्त झाला काय म्हणताय?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
पुढे अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला. अब्दुल सत्तार तुम्ही कृषी मंत्री झालात, मी तर आश्चर्यचकीतच झालो बाबा…, असे ते यावेळी म्हणाले. तसेच दादा भुसेंवर का अन्याय झाला समजलं नाही, असे टोलाही त्यांनी लगावला. अधिवेशनाचे दोन दिवस चांगलेच गाजल्याने पुढचे दिवस आणखी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Raigad : श्रीवर्धनमध्ये बोटीत आढळल्या एके-४७, दहिहांडीच्या आधीच महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर..
RTO : RTO अधिकाऱ्याच्या घरी सापडला खजिना, पगारापेक्षा ३ पट संपत्ती, आकडा वाचून हादराल
Ajeet Pavar: आपण एकत्र काम केलं आहे, मध्ये बोलायचं नाही; अजितदादांनी शंभूराज देसाईंची केली बोलती बंद
Twins : आईच्या डोळ्यांसमोर दोन जुळ्या मुलांनी सोडला जीव, मग प्रशासनाला आली जाग, वाचून हादराल