Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपमध्ये (BJP) गेलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि त्यांचा मुलगा बाळराजे पाटील (Balraje Patil) यांच्या विधानांवर जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. मोहोळ (Mohol) तालुक्यातील अनगर (Angar) नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाल्यानंतर बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिले होते. “कोणाचा नाद करा, पण अनगराचा नाद करू नका,” असे बाळराजे ने म्हटल्याने राजकीय वातावरण तापले होते.
या पार्श्वभूमीवर सोलापूर (Solapur) येथील वडाळा (Wadala) परिसरातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी नाव न घेता राजन पाटील यांच्यावर प्रखर टीका केली. ते म्हणाले, “प्रत्येकाला एक काळ असतो, दमदाटी करून चालत नाही. जास्त मस्ती आली तर लोक खड्यासारखे बाजूला काढतात. भीती दाखवून किंवा दडपशाहीच्या बळावर राजकारण करता येत नाही.” अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे अनगर परिसरातील राजकारणाला वेग आला आहे.
उज्ज्वला थिटे यांच्या अर्जाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. इथे संविधान सर्वांना समान न्याय देते. पण काही लोकांनी दमदाटीचा मार्ग निवडला आहे, हे चुकीचे आहे.” ते पुढे म्हणाले की, “आपल्या गावात चांगल्या विचारांच्या लोकांना संधी द्या. नव्या नेतृत्वाला पुढे यायला द्या आणि अनुभवी लोकांचे मार्गदर्शनही गरजेचे आहे.”
अजित पवारांनी या भाषणात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या धोरणांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आम्ही कायम महिलांचा सन्मान राखणारे लोक आहोत. महाराष्ट्र हे महिला आरक्षण देणारे पहिले राज्य आहे. पवारसाहेबांनी महिला सक्षमीकरणाची पायाभरणी केली आणि त्यामध्ये आम्ही अधिक योगदान दिले. ‘लाडकी बहिणी’ योजनेमुळे अनेक महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली.”






