Ajit Pawar and Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) संघटनेत गेल्या काही दिवसांत झालेल्या फेरबदलांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या विश्वासू नेत्यांवर पुन्हा मोठी जबाबदारी टाकली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलेले आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना पुन्हा महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यात मिटकरींसह धनंजय मुंडे (Dhananjay Munde), रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांचा समावेश आहे.
मिटकरींच्या पुनरागमनावर चर्चा
फक्त काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे-पाटील आणि इतर दोन प्रवक्त्यांना कार्यमुक्त केले होते. त्यावेळी मिटकरींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता अवघ्या तीन दिवसांतच त्यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवून अजित पवारांनी त्यांच्या क्षमतेवरचा विश्वास दाखवला आहे.
या निर्णयावर राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडाला आहे. “एका हाताने काढून घेतलं पण दुसऱ्या हाताने भरभरून दिलं,” अशीच चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सुरू आहे.
मुंडेंनाही मिळाली नवीन भूमिका
संतोष देशमुख हत्याकांडानंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडे यांनाही अजित पवारांनी स्टार प्रचारक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं, असं निरीक्षण राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मंत्रीपद गमावल्यानंतर मुंडे पक्षात काहीसे निष्क्रीय झाले होते. पण आता या नव्या जबाबदारीमुळे त्यांना पुन्हा कार्यक्षमतेने पुढे येण्याची संधी मिळणार आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत अनेक मोठी नावं
या यादीत अजित पवार, प्रफुल पटेल (Praful Patel), सुनिल तटकरे (Sunil Tatkare), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), बाबासाहेब पाटील (Babasheb Patil), माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate), दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne), अदिती तटकरे (Aditi Tatkare), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), समीर भुजबळ (Sameer Bhujbal), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble), नवाब मलिक (Nawab Malik), रुपाली चाकणकर आणि सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. या सर्वांना राज्यभरातील प्रचार मोहिमेत पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची जबाबदारी दिली आहे.
अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
या नव्या जबाबदारीनंतर अमोल मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “अजित दादांचा कार्यकर्ता असणं हेच माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. दादांच्या विचारांचा प्रचार करणं आणि त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे.”
मिटकरींच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अजित पवारांनी आपल्यावरील विश्वास परत दाखवल्याने मिटकरी आता आणखी जोमाने प्रचार मोहिमेत सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी एक संघटित आणि सज्ज टीम तयार केली आहे. स्टार प्रचारकांद्वारे पक्षाच्या विकासाभिमुख विचारसरणीचा प्रचार ग्रामीण आणि शहरी भागात पोहोचवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. अजित पवार स्वतः प्रचार मोहिमेचं नेतृत्व करणार आहेत.






