Share

Ahmedabad : आठवीच्या विद्यार्थ्यानं दहावीतील मुलाचा शाळा सुटताच मुडदा पाडला, दोन हजार नागरिक रस्त्यावर; मुख्याध्यापकाला पोलिसांसमोर चोपलं

Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad) येथील सेव्हन्थ डे स्कूल या खासगी शाळेत मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. इथे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत त्याचा जीव घेतला. शाळा सुटताच हा हल्ला करण्यात आला आणि जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

हत्येनंतर संतापाचा स्फोट, दोन हजार लोकांनी शाळा वेढली

बुधवारी सकाळी शेकडो लोक, मुख्यतः सिंधी समाज (Sindhi Community), बजरंग दल (Bajrang Dal), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या संघटनांचे कार्यकर्ते शाळेत दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम शाळेबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर रेलिंग ओलांडून आत प्रवेश केला आणि थेट शाळेतील कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं.

गार्ड, ड्रायव्हर, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर हात उचलला

शाळेत प्रवेश केल्यानंतर जमावानं गार्ड, बस चालक आणि मुख्याध्यापकासह शिक्षकांवर हात उचलला. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेस, कार आणि दुचाकींचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

पोलिसांसमोरच कर्मचाऱ्यांना मारहाण, पोलिस वाहनांचीही तोडफोड

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मणिनगर (Maninagar) परिसरातील पोलिस अधिकारी, स्थानिक आमदार, डीसीपी बलदेव देसाई (Baldev Desai) आणि एसीपी तातडीने पोहोचले. मात्र जमाव इतका संतप्त होता की पोलिसांसमोरच कर्मचाऱ्यांना मारहाण सुरूच राहिली. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक झाली. जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

एक तासानंतर लाठीमार, परिस्थिती नियंत्रणात

सुमारे एक तास हा गोंधळ सुरू होता. शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमाव पांगवावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पूर्वीचाच वाद जीवावर उठला

खोखरा (Khokhra) पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून बदला घेण्यासाठी आठवीतल्या विद्यार्थ्यानं चाकू आणला होता. शाळा सुटताच त्याने दहावीच्या मुलावर हल्ला केला. त्याला मणिनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र गंभीर जखमा आणि रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now