Share

Agriculture News : खांद्यावर नांगर, डोळ्यांत अश्रू, पायात चपलाही नाहीत, कर्जमाफीसाठी लातूरच्या बळीराजाची ५०० किमीची धगधगती पदयात्रा

Agriculture News :  लातूर (Latur) जिल्ह्यातील सहदेव होणाळे (Sahadev Honale) आणि गणेश सूर्यवंशी (Ganesh Suryawanshi) या दोन शेतकऱ्यांनी नांगर खांद्यावर घेत 500 किलोमीटरची पदयात्रा करत मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या संघर्षाचा आज नववा दिवस असून, डोळ्यांत अश्रू, पायात चपलाही नाहीत आणि पायांवर फोड उठले तरी त्यांच्या मनात केवळ एक ध्यास आहे तो म्हणजे कर्जमुक्ती आणि न्याय.

कर्जमाफीसाठी मंत्रालयाच्या दिशेने संघर्षयात्रा

श्री. होणाळे यांना बोलताना अश्रूंना आवर घालता आला नाही. त्यांनी भावनिक शब्दांत म्हटले, “व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून कर्जमाफी मिळते, मग आमचं रोजचं जगणं सरकारला दिसत नाही का?” त्यांनी 450 किमीचा प्रवास पार करत भिवंडी (Bhiwandi) गाठलं आहे. चालताना त्यांच्या पायांवर फोड उठले, तरी त्यांच्या हातातील नांगर हा फक्त शेत नांगरण्याचा नाही, तर अन्यायाविरुद्ध उठवलेला हत्यार आहे.

सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना दिसणार कधी?

श्री. सहदेव म्हणाले, “माझ्यावर दीड लाखाचं कर्ज आहे, मी ते कसंही फेडेन, पण बाकी शेतकऱ्यांचं काय? भाषणात आम्हाला हिरो बनवतात, पण रस्त्यावर चालताना आम्ही कोण?” शेतकऱ्यांची व्यथा सरकारकडून लक्षात घेतली जात नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ओबीसी आणि मराठा समाजाचं ऐक्य, मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा डाव?

राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात राजकारण्यांनी कलह निर्माण करून मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवलं आहे. सहदेव हे ओबीसी समाजातील असून, त्यांच्या संघर्षाला मराठा समाजातील गणेश सूर्यवंशी साथ देत आहेत. ही एकजूट केवळ जातीपातीपलीकडची नव्हे, तर शेतकरी प्रश्नांवर एकत्र उभे राहण्याची गरज अधोरेखित करते.

“हा नांगर फक्त माती नांगरत नाही, तर शासनाच्या व्यवस्थेवर घाव घालतो आहे”

आजचा शेतकरी फक्त पीक पेरणारा नाही, तर व्यवस्थेतील अन्यायाविरुद्ध लढणारा योद्धा आहे. ही पदयात्रा म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेसाठी एक खणखणीत इशारा आहे.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now