राहुल गांधी पुन्हा स्वीकारणार काँग्रेसचे अध्यक्षपद; चर्चांना आले उधान

 

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे.

काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या १५ ऑगस्टनंतर होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती.

पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत राहुल गांधी यांनी त्या वेळी मौन बाळगले होते. पण ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेले पक्षांतर आणि आता सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड यामुळे राहुल गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.