शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thakre) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडली होती.(After the emotional appeal of the Chief Minister, 6 MLAs joined the Shinde group)
‘ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…’ असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसेनेच्या आमदारांना केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर शिवसेनेचे आणखी ६ आमदार ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे सांगितले जात आहे. कृषिमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री आणि आमदार संजय राठोड, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर आणि दिलीप लांडे ‘नॉट रिचेबल’ झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे हे सर्व आमदार शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदा सरवणकर हे दादरमधील आमदार आहेत. तर दिलीप लांडे हे चांदिवली विभागाचे आमदार आहेत. शिवसेनेने भाजपसोबत जायला हवे, असा सल्ला आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या भाषणातून बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली होती. “माझ्या समोर या, चर्चा करा मला सांगा तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको आहात. मी आता पद सोडतो. शिवसेनेची ताकद वापरून शिवसेनेवर वार करू नका”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या भाषणात म्हणाले होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय का? मुख्यमंत्री भेटत का नाहीत? असे सगळे प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये उपस्थित झाले आहेत. या सगळ्यांवर मी आज उत्तर देणार आहे. हिंदुत्वावर विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थान सोडले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘बाळासाहेब म्हणाले होते, ‘माझ्या मागे उद्धव, आदित्यला सांभाळा’; जिल्हाप्रमुखांचा उद्धवजींना पाठिंबा
‘या’ आजोबांनी करोडोंच्या संपत्तीवर सोडलं पाणी, सर्व सोडून एकटेच राहतायत बेटावर, कारण..
बाळासाहेबांची सेना म्हणाणारे एकनाथ शिंदे स्थापन करणार नवा पक्ष? ‘हे’ आहे नव्या पक्षाचे नाव