Share

शिक्षणानंतर नोकरी नाही तर केली शेती, मातीची घरे बनवून सुरू केले ऍग्रो टुरिझम, वाचा यशोगाथा

शेती

२०१७ मध्ये राजस्थानच्या(Rajasthan) जयपूर येथे राहणारे इंद्रराज जाठ(Indraj Jath) आणि सीमा सैनी(Seema Saini) यांनी शेतीचे शिक्षण पूर्ण केले होते, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी नोकरी करावी अशी इच्छा होती. पण शिक्षणादरम्यान त्यांनी नोकरी करण्याऐवजी शेतीशी निगडित काही काम करावं, असा निर्धार केला होता.(after-education-no-job-but-farming-started-building-mud-houses-agro-tourism)

सीमाने एमएस्सी अॅग्रीकल्चरचे तर इंद्रराजने बीएस्सी अॅग्रीकल्चरचे शिक्षण घेतले आहे. आज हे दोघेही राजस्थानमधील खोरा श्यामदास गावात सुमारे दीड हेक्टर जमीन भाड्याने घेऊन एकात्मिक कृषी प्रणाली आणि कृषी पर्यटनातून चांगला नफा कमावत आहेत आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसायांबद्दलही लोकांना सांगत आहेत.

येथे ते शाश्वत शेती तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन, गाईपालन आणि उंट पालन करतात. पण या सगळ्यासाठी त्यांना बाहेरून काहीही घेण्याची गरज नाही. जनावरांच्या चाऱ्यापासून ते शेणखतापर्यंत सर्व काही ते स्वत: येथे तयार करतात आणि शेतात तयार केलेली उत्पादने येथे येणारे पाहुणे खरेदी करतात.

इंद्रराज सांगतात, “आम्ही आमच्या अभ्यासादरम्यान एकत्र ठरवलं होतं की आम्हाला शेती करायची आहे. अभ्यासानंतरच आम्ही शेती करायला सुरुवात केली. पण शेतीची व्याप्ती एवढी मोठी आहे, याची तेव्हा आम्हाला कल्पना नव्हती. जर आम्ही थोडे अजून कष्ट केले तर त्यातून चांगला नफा कमवू शकतो.”

मात्र, त्यांनी शेती सुरू केल्यावर शेतीत फारसा नफा नसल्याचे त्यांना सर्वांनी सांगितले. सीमा आणि इंद्रराज दोघेही शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतीचे आवश्यक ज्ञान आधीच होते. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या उत्तम मॉडेलनेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सीमा म्हणाल्या, “आपण फक्त शेतीवर अवलंबून राहिलो तर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. जोपर्यंत शेतकरी इतर शेतीशी संबंधित व्यवसायात सामील होत नाहीत तोपर्यंत पुढे जाणे कठीण आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

सीमा आणि इंद्रराज यांनी शेती सुरू केल्यानंतर शेतातच मातीचे घर बांधून ते राहू लागले. लोकांना ते छोटंसं राजस्थानी घर इतकं आवडलं की अनेकांनी त्यांच्या शेतात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी चिखल, शेण आणि भुसा यापासून दोन झोपड्या बांधल्या होत्या, ज्या पारंपारिक राजस्थानातील जुन्या घरांसारख्या होत्या, ते ज्या गावात राहत होते ते दिल्ली हायवे आणि जयपूर शहराच्या जवळ आहे.

त्यामुळेच इथे कृषी पर्यटनाचा विकास केला तर नक्कीच यश मिळेल, अशी त्यांना खात्री होती. या विचाराने त्यांनी ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन (कृषी पर्यटन) सुरू केले. येथे त्यांनी मातीचे पाच कॉटेज आणि एक शयनगृह देखील बांधले, जे बांधण्यासाठी त्यांना सुमारे दोन वर्षे लागली. स्थानिक कारागिरांसोबत मिळून त्यांनी ही मातीची घरे बनवली.

हे संपूर्ण मॉडेल तयार करण्यासाठी त्यांना सुमारे आठ ते दहा लाखांचा खर्च आला. गेल्या वर्षी त्यांनी या व्यवसायातून सुमारे ३५ लाखांची उलाढाल केली. २०२१ मध्ये त्यांनी याची सुरुवात केली, त्यानंतर आजूबाजूच्या शहरातील लोक येथे राहायला येऊ लागले. सीमाने सांगितले की, महिन्याला सुमारे ५० पाहुणे येथे येतात, जे पारंपरिक गावात राहण्याचा आनंद घेण्यासोबतच शेतातच उत्पादने बनवतानाही पाहतात.

इथे येणारे लोक सुट्ट्या घालवण्यासोबतच शेती आणि पशुपालनाशी संबंधित माहिती मुलांना देऊ शकतात. लोणचे, मसाले आणि तूप यांसारखी उत्पादने येथे तयार केली जातात, ज्यांना विकण्यासाठी कोणत्याही मार्केटिंगची आवश्यकता नसते. सीमा आणि इंद्रराज यांनी शेती सुरू केल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या अनेक शेतकर्‍यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ज्या शेतकर्‍यांना शेतीचे नुकसान होत होते, त्यांना एकात्मिक शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आज सुमारे ८००० शेतकरी त्यांच्याशी जोडले जात आहेत आणि शेती, पशुसंवर्धन आणि कृषी पर्यटनातून नफा कमावत आहेत. शेतीला जोडून चांगला नफा कमावता येईल, असे त्यांच्या कुटुंबीयांना कधी वाटले नव्हते, पण आज त्यांनी कृषी पर्यटनाचे उत्तम मॉडेल तयार करून स्वत:सह इतर अनेक शेतकर्‍यांना नवा मार्ग दाखवला आहे.

ताज्या बातम्या शिक्षण शेती

Join WhatsApp

Join Now