पाकिस्तान संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तान मध्ये इम्रान खान यांच्या राजकीय नाट्यांला पूर्णविराम मिळाला असून, इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे. आता विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानात आजवर कोणत्याही सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. आता इम्रान खान यांनाही मोठ्या राजकीय नाट्यानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता.
या ठरावाच्या बाजूने 174 सदस्यांनी मतदान केले असून हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत असल्याचे पॅनल ऑफ चेअरमन आयज सादिक यांनी जाहीर केले, आणि इम्रान खान यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं. नवीन पंतप्रधान म्ह्णून ज्यांचे नाव सांगितले जाते ते शाहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या सदस्यांनीही सभागृहातून काढता पाय घेतला.
पुढचं कामकाज पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी चालवलं. अविश्वास ठरावावर मध्यरात्रीनंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा ठराव अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी जिंकला. इम्रान यांच्यावर 174 सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला व ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सादिक यांनी बहुमताने हा ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, शाहबाज शरीफ म्हणाले, पाकिस्तानसाठी ही नवी पहाट आहे. इम्रान खान यांच्यावर मोठी कारवाई होईल. मात्र, आम्ही सूडबुद्धीने काम करणार नाही, कायद्यापुढे कुणीही मोठं नाही. निरपराधांना जेलमध्ये टाकायचं ही आमची वृत्ती नाही. पण, कुणी गुन्हेगार असेल तर त्याला कायदा शासन करेल, असे ते म्हणाले.