गुन्हा कितीही लपवला तरी तो लपत नाही, हे मुंबई पोलिसांनी सिद्ध करुन दाखवले आहे. सुमारे २८ वर्षांपूर्वी एका महिलेची आणि तिच्या मुलांची हत्या करून फरार झालेला आरोपीला जेरबंद करण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. राजकुमार चौहान असे या मारेकरऱ्याचे नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासुन कतारमध्ये राहत होता. अनेक वर्षांपासुन शोधात असलेला राज कुमार चौहानला मुंबई विमानतळावर पोलिसांनी शिताफिने पकडले.
२८ वर्षांपूर्वी राज कुमार चौहान आणि त्याचे साथीदार अनिल सरोज व सुनील सरोज यांनी जगरानी देवी (वय २७) आणि तिच्या तीन लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर तिघेही फरार झाले होते. तेव्हापासून शोधात असलेल्या या तीन आरोपींपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे इतर दोन आरोपींचा शोध घेणे शक्य होईल.
१९९४ च्या सुमारास मिरारोड परिसरातील पेणकरपाडा येथे राजकुमार चौहान आणि सरोज बंधू राहत होते. जगरानी देवी यांचे कुटुंब त्यांच्या शेजारी वास्तव्याला होते. जगरानी देवींवर या तिघांनी लैंगिक अत्याचार केले होते. जगरानी यांच्या पतीने या कृत्याचा पर्दाफाश सगळ्या लोकांसमोर केला होता. यानंतर त्या दोघांत जोरदार भांडण झाले होते. या सगळ्याचा राग डोक्यात ठेऊन १६ नोव्हेंबर १९९४ ला जगरानी देवी आणि त्यांच्या तीन मुलांची हत्या केली. या मुलांचे अनुक्रमे वय पाच, दोन आणि तीन महिने इतके होते.
रात्री ११ वाजता जगरानी देवी यांचे पती घरी परतल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. राजनारायण प्रजापती यांच्या तक्रारीनंतर पोलिस या आरोपींचा शोध घेत होती. परंतू तिघेही आरोपी फरार असल्यामुळे या प्रकरणाचा तपास रखडला होता. २००६ साली राजनारायण प्रजापती यांचा अपघातती मृत्यू झाला.
गेल्यावर्षी ही केस रिओपन करण्यात आली होती, अशी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी माहिती दिली. तेव्हा या प्रकरणातील आरोपींच्या शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले होते. तेथे वाराणसीत जवळ-जवळ २० दिवस हे पथक ठाण मांडून बसले होते.
त्यावेळी राजकुमार चौहान बद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती. राजकुमार चौहान २०२० पासुन कतारमध्ये कामाला असल्याचे कळाले होते. या महितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपासास सुरवात केली होती. राजकुमार चौहानच्या पासपोर्टच्या तपासानंतर त्याची लूकआउट नोटीस पोलिसांनी जारी केली होती.
राज कुमार चौहानला या सगळ्याची जराही कल्पना नव्हती. यामुळे गुरुवारी जेव्हा तो मुंबई विमानतळावर आला तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असुन इतर दोन आरोपींचा तपास करण्यात पोलीस कार्यरत आहेत.