Adv. Anjan : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे वकील महिला अॅड. ज्ञानेश्वरी अंजान(Adv. Anjan) यांना अमानुषपणे मारहाण झाल्याची गंभीर घटना 14 एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी गावातील सरपंचासह 10 जणांविरोधात युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर गावकऱ्यांनी यावर आक्रमक प्रतिक्रिया देत काही धक्कादायक आरोप केले आहेत.
गावकऱ्यांच्या मते, अॅड. अंजान(Adv. Anjan) आणि त्यांचे कुटुंब हे सातत्याने गावकऱ्यांना त्रास देत असून, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रकार अनेक वेळा घडला आहे. गावातील काही नागरिकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने यापूर्वीही खोटे खुनाचे आरोप (IPC 302) सात गावकऱ्यांवर लावले होते. मृत व्यक्ती नैसर्गिक मृत्यूमुळे गेल्याचे पीएम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्यानंतरही त्या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा दावा करण्यात आला आहे.
त्याचबरोबर एक धक्कादायक आरोप असाही करण्यात आला आहे की, मृत आजोबांच्या मृत्यूच्या तीन तासांनंतर त्यांच्या मृतदेहावर बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गावकऱ्यांनी वकिल महिलेच्या कुटुंबावर आर्थिक स्वार्थासाठी खोटे गुन्हे दाखल करून लोकांकडून पैसे उकळण्याचा आरोप केला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, या प्रकरणात सत्य बाहेर यावे यासाठी आरोपी आणि फिर्यादी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी.
दरम्यान, ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी सरपंच अनंत रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बब्रुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानोबा जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबुराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे आणि नवनाथ दगडू मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर समोर आला. सध्या याप्रकरणाचा तपास पोलीस करत असून, पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र आता या प्रकरणातील खरे तथ्य कोणते, हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.
adv-anjan-and-his-family-are-constantly-harassing-the-villagers