Aditya Thackeray : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या हत्या प्रकरणानंतर राज्यात मोठा राजकीय आणि सामाजिक गदारोळ निर्माण झाला आहे. या खुनानंतर सीआयडीच्या आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली. अनेक सामान्य नागरिकांसोबतच विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली. याच प्रकरणानंतर धनंजय मुंडे(Dhananjay Munde,) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणावर आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला न्याय देणंही अशक्य!” – आदित्य ठाकरे
नाशिकमध्ये आयोजित शिवसेना (ठाकरे गट) निर्धार शिबिरात आदित्य ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. “बीड आणि परभणी प्रकरणं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. बीडचा आका कोण आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. एका कार्यकर्त्याची हत्या झाली आणि त्यालाही न्याय मिळू शकला नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून न्याय मागणं हाच गुन्हा ठरत आहे,” अशा शब्दांत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
वक्फ कायद्यावरूनही भाजपवर टीका
वक्फ सुधारणा विधेयकावरूनही आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना* म्हटलं की, “वक्फ कायदा भाजपनेच आणला. त्यांच्या नेत्यांच्या भाषणांवरूनच हे स्पष्ट होतं की, हिंदूंच्या हिताचा विचार करणारे भाजपचेच लोक हिंदूंविरोधात काम करत आहेत. सिद्धिविनायक मंदिर वक्फ अंतर्गत येणार असल्याच्या अफवा निवडणुकीपूर्वी पसरवण्यात आल्या.”
“गँगवॉर पुन्हा सुरू… मुख्यमंत्री कुठे आहेत?”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “गेली 18 वर्षे केंद्रात भाजपचं सरकार आहे, मग रोहिंगे आणि बांगलादेशी देशात कसे आले? जे गँगवॉर बाळासाहेब ठाकरे यांनी थांबवले, तेच गँगवॉर आता पुन्हा राज्यात सुरू होत आहेत. खून, बलात्कार यांच्या काळात वाढलेत. असा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे की नाही, यावरच प्रश्नचिन्ह आहे.”
या सगळ्या वक्तव्यांमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, संतोष देशमुख प्रकरण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. आता यावर सरकारची पुढील प्रतिक्रिया काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
aditya-thackeray-angry-over-santosh-deshmukh-case