Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपडेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याबरोबर १४ इतर लोकांविरुद्धही या प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला आहे. श्रेयस आणि इतर आरोपींवर उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांशी संबंधित एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात आरोप झाले आहेत.
या गुन्ह्यात, ग्रामस्थांना उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले गेले होते, परंतु नंतर एजंटांनी पैसे घेऊन पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे. महोबा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या चिट फंड घोटाळ्याचा हा भाग आहे, ज्यात ‘द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ नावाच्या कंपनीचा समावेश आहे.
या कंपनीने ग्रामस्थांना त्यांच्या गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. एजंटांनी स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले होते आणि त्यांना लवकरात लवकर परतावा मिळवण्याचे वचन दिले होते.
मात्र, जेव्हा या गुंतवणुकीच्या योजनेच्या कायदेशीर बाबी उघडकीस आल्या, तेव्हा एजंटांनी आपली कार्यवाही थांबवली आणि ग्रामस्थांना तसच जिल्ह्यातून फरार झाले. या घटनेनंतर, महोबाच्या श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.