समृद्धी महामार्ग काही दिवसांपुर्वीच सगळ्यांसाठी खुला करण्यात आला. पण महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. वन्यप्राणी रस्त्यावर आल्यामुळेही अनेक अपघात घडले आहेत.
गाडीचा टायर फुटल्यामुळेही अनेक अपघात झाले आहेत. अशातच आणखी एका भीषण अपघातामुळे एका प्रवाशाचा जीव गेला आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा जवळ जाणाऱ्या समृद्धी मार्गावर खाजगी बसचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर सहा जण जखमी झाले आहेत.
जखमींवर जालण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर नुकताच आणखी एका खासगी बसचा अपघात झाला होता. त्यामध्येही एका प्रवाशाचा मृत्यु झाला होता. रात्री एक खासगी बस महामार्गावर उलटली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यु झाला तर २० प्रवासी जखमी झाले.
नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने ही बस चालली होती. ही बस देऊळगाव नजीकच्या असोला फाटा गावाजवळ उलटली आणि तिचा अपघात झाला. झाले असे होते की, बस उलटल्यानंतर अपघातग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर येत होते. प्रवासी बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला चालले होते कारण बस मध्यभागी उलटली होती.
प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार टक्कर मारली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यु झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. बस उलटल्यानंतर २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.
टायर गरम होऊन फुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत. टायरामध्ये साधारण हवेच्या ऐवजी नायट्रोजन एअर भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अपघात झाल्यानंतर फोन केल्यानंतर तुम्हाला तातडीने मदत मिळते हे ही तितकेच खरे आहे. पण महामार्गावर स्पीड लिमिट जास्त असल्याने भरधाव वाहने जात असतात ज्यामुळे ताबा सुटून अनेक अपघात घडत आहेत.