Chala Hawa Yeu Dya 2 : मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाबाबत चर्चेला सध्या जोर चढलेला आहे. अनेक बदलांसह ‘चला हवा येऊ द्या 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या नव्या पर्वात एक मोठा बदल घडतो आहे. तो म्हणजे सूत्रसंचालक बदलण्याचा.
या आधी ‘चला हवा येऊ द्या’च्या पहिल्या पर्वात सूत्रसंचालन आणि दिग्दर्शन निलेश साबळे (Nilesh Sable) यांच्याकडे होतं. पण दुसऱ्या पर्वात त्यांच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.अभिजीत खांडकेकरने याआधी विविध पुरस्कार सोहळे, रिअॅलिटी शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं यशस्वी सूत्रसंचालन केलं आहे. आता एका लोकप्रिय विनोदी शोमध्ये सूत्रधार म्हणून त्याला बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
या नव्या पर्वात दिग्दर्शनाची जबाबदारी प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav), अमोल पाटील (Amol Patil) आणि योगेश शिरसाट (Yogesh Shirsat) यांच्या खांद्यावर असेल. लेखन विभागात प्रियदर्शन जाधव, योगेश शिरसाट यांच्यासह अभिषेक गावकर (Abhishek Gavkar), रोहित कोतेकर (Rohit Kotekar), पुर्णानंद वांडेकर (Poornanand Vandekar) आणि अनिश गोरेगावकर (Anish Goregaonkar) यांचाही समावेश आहे.
कलाकारांच्या टीममध्ये श्रेया बुगडे (Shreya Bugade), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भरत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्यासह हास्यजत्रा फेम गौरव मोरे (Gaurav More) याची नव्याने भर पडली आहे. याशिवाय सध्या या नव्या पर्वासाठी नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन्सही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना काही नवीन चेहरे पाहायला मिळणार, हे नक्की.
‘चला हवा येऊ द्या’चा पहिला सीझन जवळपास १० वर्ष गाजला होता. मात्र कालांतराने या कार्यक्रमाची लोकप्रियता काहीशी कमी झाली. यानंतर निलेश साबळे, भाऊ कदम (Bhau Kadam), स्नेहल शिंदे (Snehal Shinde) आणि ओंकार भोजने (Onkar Bhojne) या टीमने ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ (Hasatay Na Hasaylach Pahije) या कार्यक्रमातून पुनरागमन केलं. पण कमी टीआरपीमुळे तो शो केवळ तीन महिन्यांतच बंद पडला.
आता ‘चला हवा येऊ द्या 2’च्या माध्यमातून एक नवा प्रयोग करण्यात येतोय. अभिजीत खांडकेकरसारखा तडफदार आणि अभ्यासू सूत्रसंचालक नव्या पर्वात काय धमाल उडवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.