अबब! देशात एका दिवसात तब्बल २४,८५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली। देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल. अशी तज्ज्ञांनी वर्तविलेली भीती आता खरी ठरताना दिसत आहे.

कारण, गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाची लागण झालेले तब्बल २५ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २४,८५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,७३,१६५ इतकी झाली आहे. यापैकी २,४४,८१४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४,०९,०८३ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

मात्र, कोरोनामुळे देशातील १९,२६८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे.

शनिवारी महाराष्ट्राने नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सुमारे ७,०७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील देशी लस विकसित होण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, इतक्या वेगाने लस निर्माण करण्यासंदर्भात भारतातील तज्ज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.