आम आदमी पक्ष लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे ‘शाखा’ सुरू करणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी प्रमुख संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. यावेळी संजय सिंह यांनी भाजपवर टीका देखील केली. देशात भाजप(BJP) द्वेषाचे राजकारण करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी केला आहे.(AAP will establish branches like RSS)
आपचे उत्तर प्रदेश प्रभारी प्रमुख संजय सिंह यांनी ३० एप्रिल रोजी लखनऊमधील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. भाजपने इंग्रजांप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबले आहे, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. यावेळी उत्तर प्रदेश प्रभारी प्रमुख संजय सिंह यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत आपचे उत्तर प्रदेश प्रभारी प्रमुख संजय सिंह म्हणाले की, “भाजपच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणामुळे देश कमकुवत होत आहे. यावेळी लोकांना भाजपच्या विरोधात जागं करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आम आदमी पक्षाने ‘शाखा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.”
“भाजपचे द्वेषाचे राजकारण असेच सुरू राहिले तर भारताची मूळ ओळख नष्ट होईल. भारताच्या अस्मितेचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी आम आदमी पक्ष संपूर्ण उत्तर प्रदेशात तिरंगा शाखा सुरू करणार आहे. या तिरंगा शाखांच्या माध्यमातून भाजपला उत्तर दिले जाणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्या विरुद्ध आपच्या शाखा असणार आहेत”, असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
आपचे उत्तर प्रदेश प्रभारी प्रमुख संजय सिंह पुढे म्हणाले की, “आम आदमी पक्ष ‘प्रत्येक भारतीयाची ओळख आणि भारताचे संविधान’ या ध्येयावर काम करेल. येत्या सहा महिन्यांमध्ये या शाखा स्थापन केल्या जाणार आहेत. १ जुलैपासून तिरंगा शाखाप्रमुखांची निवड केली जाणार आहे. या माध्यमातून १०,००० तिरंगा शाखाप्रमुख बनवले जातील”, असे संजय सिंह यांनी सांगितले आहे.
आम आदमी पक्षाने सुरू केलेल्या शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतील, असे संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. तिरंगा शाखांमधील प्रत्येक बैठकीनंतर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लोकांना वाचून दाखवण्यात येईल, असे देखील संजय सिंह यांनी सांगितले आहे. आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबनंतर आता उत्तर प्रदेशकडे आपले लक्ष वळवले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंवर पोलिस कठोर कारवाई करणार, गृहमंत्र्यांचे स्पष्ट संकेत; म्हणाले…
‘अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहीजे; हीच खरी मराठेशाही ठरेल’
“मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल महत्वाची”