How to Aadhaar Mobile Update: आता घरबसल्या काही सेकंदांत बदला आधारवरील मोबाईल नंबर! कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस

How to Aadhaar Mobile Update : आता आधारवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यूआयडीएआय (UIDAI) ने घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी एक अत्याधुनिक डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी नोंदणी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करावी लागत असताना, आता फक्त आधार अॅपद्वारे ओटीपी आणि फेस व्हेरिफिकेशनचा वापर करून नंबर बदलता येणार आहे. ही नवी सुविधा विशेषतः दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी तसेच वृद्धांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

यूआयडीएआयच्या या नव्या उपक्रमामुळे मोबाईल नंबर बदलताना कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही आणि संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल. युझरने आधार अॅप इन्स्टॉल करून त्यात स्वतःचा आधार क्रमांक आणि बदलायचा मोबाईल टाकायचा. त्यानंतर जुन्या किंवा नवीन नंबरवर ओटीपी येईल आणि स्मार्टफोन कॅमेऱ्यातून फेस ऑथेंटिकेशन झाल्यावर प्रक्रिया पूर्ण होईल. ही प्रणाली सोपी, जलद आणि पूर्णपणे डिजिटल सुरक्षेने युक्त आहे.

आधार कार्ड देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे आणि त्यातील मोबाईल नंबर हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. बँक खाते, सरकारी अनुदान, केवायसी पासून ते डिजी-लॉकरच्या सेवांपर्यंत सर्व व्यवहार ओटीपीवर आधारित होत असल्याने चुकीचा किंवा कालबाह्य मोबाईल नंबर मोठा प्रश्न निर्माण करतो. आतापर्यंत नंबर बदलण्यासाठी केंद्रात जावं लागत असल्याने लांब रांगा आणि वेळेचा अपव्यय होत असे. पण डिजिटल सुविधा सुरू झाल्याने हा अडथळा पूर्णपणे दूर होणार आहे.

याच दरम्यान, यूआयडीएआयने एक महिन्यापूर्वी आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक नवं मोबाइल अॅप लाँच केलं आहे. या अॅपमध्ये एका फोनवर पाच लोकांचे आधार तपशील सेव्ह ठेवता येतात आणि फक्त आवश्यक माहिती शेअर करण्याचा पर्याय दिला आहे. स्कॅन करून UPI पेमेंटसारखीच पद्धत वापरून आधार माहिती शेअर करता येते. सुरक्षा वाढवण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

नवीन आधार अॅपची महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • ई-आधार नेहमी मोबाईलमध्ये उपलब्ध; कागदी प्रत नेण्याची गरज नाही.

  • फेस स्कॅन शेअरिंग सुविधा — पिन आणि ओटीपीसारखीच सुरक्षित.

  • बायोमेट्रिक लॉगिनमुळे अॅप अधिक सुरक्षित.

  • हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध.

  • इंटरनेट नसतानाही आधार अॅक्सेस करण्याची सुविधा.

जुने mAadhaar अॅप आणि नवीन आधार अॅप यांचे उद्दिष्ट वेगवेगळे आहे. पीडीएफ डाउनलोड किंवा पीव्हीसी कार्डसाठी पूर्वीचे अॅपच उपयुक्त आहे, तर निवडक माहिती शेअर करायची असल्यास नवं अॅप जास्त सुरक्षित आहे.

या नव्या फिचर्समुळे हॉटेल चेक-इन, बँक केवायसी, सिम अॅक्टिव्हेशन यांसारख्या प्रक्रिया जलद आणि सोप्या होणार आहेत. घरातील सर्व सदस्यांचे आधार तपशील एका फोनवर हाताशी असतील आणि कोणता डेटा शेअर करायचा हे स्वतः निवडता येणार असल्याने गोपनीयता अधिक सुरक्षित राहील.