Dinanath Mangeshkar Hospital : पुणे – राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये मानल्या जाणाऱ्या पुण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या उपचारांमध्ये झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे खाजगी रुग्णालयांतील धोरणे आणि माणुसकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या गर्भवती होत्या. २८ मार्च रोजी त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांचे डिपॉझिट मागितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अडीच लाख रुपये तत्काळ भरू, उर्वरित रक्कम नंतर दिली जाईल, अशी विनंती करूनही रुग्णालयाने ती ऐकून घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मंत्रालयातून हस्तक्षेप झाल्यानंतर रुग्णालयाने तनिषा यांना दाखल करून घेतले, मात्र अपेक्षित आर्थिक अटी पूर्ण न झाल्यामुळे उपचारास विलंब झाला. अखेर नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. तिथे जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अंतर्गत चौकशी सुरू केल्याचे वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’ने दिले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधीच्या कुटुंबीयांना असे अनुभव येत आहेत, तेव्हा सामान्य जनतेची काय अवस्था होत असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील वैद्यकीय सुविधांवरील विश्वास आणि माणुसकीच्या मूल्यांबाबत गंभीर चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. वेळेवर उपचार मिळाले असते, तर तनिषा यांचा जीव वाचला असता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे