स्वातंत्र्यलढ्यातील RSS च्या योगदानावर शालेय अभ्यासक्रमात येणार एक धडा; NCERT चा वादग्रस्त निर्णय

 

नवी दिल्ली | राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (NCERT) शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात सुधारणा करण्याचे ठरवले आहे. NCERT ने पाठ्यपुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावरील एका धड्याचा समावेश करण्याचे ठरवले आहे.

ANI वृत्त संस्थेने ट्विट करून याबाबतची माहिती दिली असून अनेक विद्यार्थ्यांनी व लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. NCERT च्या या निर्णयामुळे ट्विटरवर त्यांना ट्रोल केले जात आहे.

काहींचे असे म्हणणे आहे की, आरएसएस ही कट्टर हिंदुत्ववादी संस्था आहे. त्यांचा इतिहास देखील तेच सांगतो. त्यामुळे मुलांच्या मनात लहानपणापासूनच हिंदुत्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप काहींनी NCERT वर केला आहे.

दरम्यान, अशाच प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने द्वितीय वर्षाच्या बीए (इतिहास) कोर्समध्ये आरएसएसच्या इतिहासाचा समावेश केला होता. ज्या अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या विभागात राष्ट्र संघटनेत आरएसएसच्या भूमिकेविषयी तपशीलवार माहिती देण्यात आली होती.

यातील पहिला विभाग काँग्रेस पक्षाची स्थापना आणि जवाहरलाल नेहरूंच्या उदयाविषयी बोलतो. तर दुसरा भाग सविनय कायदेभंग चळवळीविषयी आहे.

त्यावेळी असे सांगण्यात आले होते की हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना इतिहासातील ‘नवीन ट्रेंड’ विषयी जागरूक करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे. आता अशाच प्रकारच्या अभ्यासक्रमाचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये देखील समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.