Nagpur : नागपूरच्या इमामवाडा परिसरात एका पित्याची निर्घृण हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नरेश वालदे (53) हे पेंटिंगचे काम करणारे व्यक्ती आपल्या मुलीला छेडणाऱ्या गुंडांविरोधात उभे राहिले होते. मात्र, त्यांना या धैर्याची मोठी किंमत मोजावी लागली.
मुलीची छेड काढणाऱ्या गुंडांनी केला पित्याचा खून
गेल्या काही दिवसांपासून एक गुंड नरेश वालदे यांच्या मुलीचा पाठलाग करत होता. या त्रासाला कंटाळून नरेश वालदे यांनी त्याला जाब विचारला होता. त्यातूनच काही दिवसांपूर्वी आरोपींमध्ये आणि नरेश वालदे यांच्यात जोरदार वाद झाला होता. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
फोन करून बोलावलं आणि निर्घृण हत्या
बुधवारी, 26 मार्च रोजी दुपारी नरेश वालदे आपल्या कामात व्यस्त असताना त्यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला. त्यांना जाटतरोडी भागात बोलावण्यात आलं. तिथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करत त्यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाले.
कुटुंबावर शोककळा – पोलीस गप्प
नरेश वालदे आपल्या वृद्ध आई आणि तीन मुलींसोबत इमामवाडा परिसरात राहात होते. मुलींना वारंवार त्रास दिल्या जात असल्याने ते सतत संघर्ष करत होते. मंगळवारी रात्री त्यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती. त्यावर त्यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. सध्या पोलीस विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
संशयाचं विष – मित्राच्या खुनापर्यंत मजल
भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी गावात मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. अंकुश साठवणे (38) हे देव्हाडी ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्यांचा मित्र मुन्ना बिरणवार (32) याने संशयाच्या भरात त्यांची हत्या केली.
विवाहबाह्य संबंधाचा संशय अन् मैत्रीचा शेवट
मुन्ना बिरणवार याला काही दिवसांपासून आपल्या पत्नीचे अंकुश साठवणे यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. वाद इतका टोकाला गेला की, अखेर मुन्नाने अंकुश यांच्यावर चाकूने सपासप वार करत त्यांना ठार मारलं.
आरोपीला अटक – गावात तणाव
या घटनेमुळे देव्हाडी गावात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपी मुन्ना बिरणवार याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.