Share

Pune : पुण्यातील नकली मुख्यमंत्र्यांवर अखेर गुन्हा दाखल; चर्चेला उधाण

गणेशोत्सवादरम्यान पुण्यात नकली मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेल्या विजय मानेंवर आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. समाजामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी विजय मानेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान या नकली मुख्यमंत्र्यांची मोठी क्रेज पहायला मिळली होती. अनेक ठिकाणी त्यांनी हजेरी लावली होती. तर त्यांचे डान्स करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. अनेक ठिकाणी या नकली मुख्यमंत्र्याला विविध उद्घाटनासाठी देखील बोलावले गेले होते.

विजय मानेंचा आरोपी शरद मोहळ सोबतच फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांसारखा पेहराव करून विजय माने यांनी अनेक ठिकाणी नृत्य देखील केले. त्यामुळे समाजामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी या नकली मुख्यमंत्र्यांवर म्हणजेच विजय मानेंवर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय नंदकुमार माने यांच्यावर IPC ४१९-५११, ४६९, ५००, ५०१, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विजय माने यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, विजय माने हे हुबेहुब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि ते परिधान करत असलेले व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट, त्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांची डुप्लिकेट कॉपीच दिसतात.

दरम्यान, नकली मुख्यमंत्री विजय मानेंना पुण्यातील अनेक मंडळांनी आरतीसाठी बोलवले होते. माने रोज शहरभर फिरून सात ते आठ मंडळाच्या आरत्या पार पडत होते. वाढत्या क्रेजमुळे या नकली मुख्यमंत्र्यांसह फोटो काढण्यासाठी लोक गर्दी देखील करत होते.

बाॅलीवुड इतर राज्य

Join WhatsApp

Join Now