शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर आज पक्षातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे १८ पैकी केवळ १० खासदार उपस्थित होते. ८ खासदार या बैठकीला हजर नव्हते.(A big argument in Uddhav Thackeray’s meeting)
यामुळे आमदारांप्रमाणे शिवसेनेचे खासदार देखील बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यादरम्यान बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. बैठक पार पडल्यानंतर संजय राऊत कोणाशीही न बोलता बाहेर पडले, अशी माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर आज शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला पाहिजे, यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदारांनी एकत्र मिळून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करावे, अशी भूमिका मांडली आहे.
पण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शविण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. या मुद्द्यावरून बैठकीमध्ये संजय राऊत आणि शिवसेना खासदारांमध्ये खडाजंगी झाल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांमध्ये यासंदर्भातील निर्णय जाहीर करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील खासदारांना सांगितले.
या बैठकीनंतर संजय राऊत कोणाशीही न बोलता बाहेर पडले. या बैठकीला गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे यांच्यासह इतर शिवसेनेचे सहा खासदार हजर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे या बैठकीला अनुपस्थित होते. तसेच भावना गवळी, संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार देखील बैठकीला हजर नव्हते.
राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शविण्याची विनंती केली. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणाला मतदान करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लोकसंख्येचा होतोय विस्फोट, भारताची परिस्थिती गंभीर, ‘या’ धर्माची लोकं आहेत सर्वात जास्त
…नाहीतर बिश्नोई गँग सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई मागे हटायला तयार नाही
‘या’ 8 क्रिकेट दिग्गजांवर आहे बलात्काराचा आरोप; पांंड्यासह तीन भारतीय खेळाडूंचाही आहे समावेश