BJP Shivsena UBT Clash: मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच राजधानीत राजकीय वातावरण तापत चालले आहे. आरोप-प्रत्यारोपांबरोबरच कार्यकर्त्यांची आक्रमकता वाढताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट (Shivsena ) यांच्यातील संघर्षामुळे मुंबईतील प्रचाराला गालबोट लागल्याची घटना घडली. मुंबई (Mumbai) येथील चांदिवली (Chandivali) परिसरात झालेल्या चौक सभेदरम्यान दोन गट आमनेसामने आले आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
ही घटना मंगळवारी रात्री संघर्षनगर (Sangharsh Nagar) येथे घडली. येथे आयोजित सभेची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूचे कार्यकर्ते अचानक सभास्थळी पोहोचल्याने वादाला तोंड फुटले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही क्षणातच धक्काबुक्की, शिवीगाळ आणि हाणामारीत त्याचे रूपांतर झाले. प्रचाराच्या गडबडीत झालेल्या या राड्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाची माहिती मिळताच साकीनाका पोलीस (Sakinaka Police Station Mumbai) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार या वादात अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र नेमकी चूक कुणाची, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशा घटनांमुळे लोकशाही प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.






