Raj Thackeray : राज्यात सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकांवर आता थेट राजकीय संघर्ष पेटताना दिसत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या या पद्धतीवर जोरदार टीका करण्याची तयारी केली आहे. मुंबई (Mumbai) पासून ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून येणाऱ्या सभांमधून या सगळ्या प्रक्रियेची पोलखोल केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात घडलेल्या घडामोडींमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. दबाव, आर्थिक आमिष आणि फोन कॉल्सच्या माध्यमातून उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे एका उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर हा मुद्दा अधिक चिघळला. त्यामुळे बिनविरोध निवडीमागचं सत्य जनतेसमोर आणण्यासाठी पुराव्यांसह भूमिका मांडली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओद्वारे पुरावे सादर होणार
आगामी प्रचारसभांमध्ये कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून नेमकं काय घडलं, हे उघड केलं जाणार आहे. संबंधित भागांतील काही नेत्यांनी हे पुरावे पक्षनेतृत्वाकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे “लाव रे तो व्हिडिओ” असा थेट इशाराच दिला जात आहे. बिनविरोध निवडींच्या मुद्द्यावर पक्षाने न्यायालयीन मार्गही स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून येत्या सोमवारी याबाबत कायदेशीर पावलं उचलली जाणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाची भेट आणि न्यायालयात जाण्याची तयारी
या संपूर्ण प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडेही दाद मागण्याचा निर्णय झाला आहे. बिनविरोध उमेदवार कोणत्या पद्धतीने निवडून आले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि मतदारांचा हक्क अबाधित राहावा, यासाठी हा लढा असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
70 बिनविरोध नगरसेवकांमुळे राजकीय वातावरण तापलं
महापालिका निवडणुकांसाठी मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यभरात तब्बल 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्येने सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत. या प्रकारामुळे निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यापूर्वी अनेक निवडणुका पाहिल्या असल्या तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी कधीच पाहिल्या नाहीत, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा पक्षनिहाय आकडा
- राज्यातील उपलब्ध माहितीनुसार
- भाजप – 44
- शिवसेना शिंदे गट – 22
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – 2
- इस्लामिक पार्टी – 1
- अपक्ष – 1





