Pune Election 2026: पुण्यातील राजकारणात काही दिवसांपासून चर्चेत असलेला एबी फॉर्म प्रकरणाचा वाद अखेर मिटल्याचं चित्र आहे. उद्धव कांबळे (Uddhav Kamble ) यांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शिंदे गटातील तणावाला पूर्णविराम मिळाला आहे. आपल्याच पक्षातील दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म फाडून तो गिळल्याच्या घटनेमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या कांबळेंना थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आला आणि त्यानंतरच निर्णय बदलल्याचं समोर आलं आहे.
प्रभाग क्रमांक ३६ मधून निवडणूक लढवण्याची तयारी केलेल्या कांबळेंनी अखेर अर्ज मागे घेतल्याने शिवसेना (Shinde Group ) च्या अधिकृत उमेदवाराचा मोठा पेच सुटला आहे. “तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही,” असा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरच माघारीचा निर्णय घेतल्याचं पक्षातील सूत्रांकडून सांगितलं जात आहे. सध्या पुणे दौऱ्यावर असलेले मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही कांबळेंना भेटीसाठी बोलावल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं होतं?
धनकवडी–सहकारनगर येथील क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान हा सगळा गोंधळ उडाला होता. आपल्याला उमेदवारी डावलण्यात आल्याचा आरोप करत कांबळेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हातातून थेट दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज हिसकावून घेतला. काही क्षणातच त्यांनी कार्यालयातून बाहेर पडत स्वच्छतागृह गाठलं.
पोलिसांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आतून दार बंद केलं. काही वेळातच अर्जाचे तुकडे करून ते गिळल्याचं स्पष्ट झालं. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेत मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांत गुन्हा, निवडणूक यंत्रणा सतर्क
अर्ज छाननीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक अधिकारी सुप्रिया करमरकर (Supriya Karmarkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज पाहण्याच्या प्रक्रियेदरम्यानच हा प्रकार घडला असून, त्याबाबत अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी, उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता उघड झाली होती. मात्र, थेट वरिष्ठ हस्तक्षेपानंतर आता हा वाद शांत झाल्याचं दिसत आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
काही मिनिटांच्या राड्यानं राज्यभर चर्चेत आलेलं हे प्रकरण अखेर एका फोनवर मिटल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उमेदवारीवरून पेटलेला वाद निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी किती धोकादायक ठरू शकतो, याचं हे जिवंत उदाहरण मानलं जात आहे.





