Shivraj Patil Chakurkar : काँग्रेस (Congress Party) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाची छाप सोडणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि लातूर (Latur City) येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ढासळत होती, वृद्धापकाळामुळे प्रकृती सतत खालावत चालली होती.
९० वर्षांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनात शिवराज पाटील चाकूरकर यांनी राज्यापासून केंद्राच्या राजकारणापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. संवैधानिक प्रक्रिया, चांगले प्रशासकीय निर्णय आणि राजकीय शिस्त राखणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदे त्यांनी भूषवली आणि देशाच्या कामकाजात महत्त्वाचे निर्णय घेतले.
केंद्रीय राजकारणात मोठं योगदान
शिवराज पाटील चाकूरकर यांनी “देवघर” या लातूरमधील निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. दीर्घकालीन आजारामुळे काही महिन्यांपासून त्यांच्यावर घरातच उपचार सुरू होते. १२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर गावात जन्मलेल्या या नेत्यांनी मराठवाड्यात काँग्रेसला बळकटी दिली. लातूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळा विजय मिळवत त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली. २००४ च्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी राज्यसभेतून त्यांची केंद्रीय गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली.
गृहमंत्रिपद, संरक्षण मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष असे महत्त्वाचे पदभार
१९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९९१ ते १९९६ या काळात ते लोकसभेचे दहावे अध्यक्ष राहिले. पुढील काळात २००४ ते २००८ दरम्यान ते केंद्र सरकारचे गृहमंत्री होते. पदाचा राजीनामा दिल्यानंतर २०१० ते २०१५ दरम्यान त्यांनी पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणूनही काम पाहिले.
२६/११ मुंबई हल्ल्यानंतर टीका आणि राजीनामा
२००८ मधील २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेतील त्रुटींवर व्यापक टीका झाली. त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हल्ल्यातील गोंधळाच्या काळात वेशभूषा बदलल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, तरीही त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा त्याग केला.