Pune Crime : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून घडलेल्या भीषण खुनानं संपूर्ण शहर हादरलं आहे. लखन ऊर्फ सोन्या बाळू सकट (Laxan Sonya Sakat) या 18 वर्षीय तरुणाची, ‘बहिणीसोबतचे संबंध तोड’ असा इशारा दिल्याचा राग मनात धरून त्याच्या विरोधकांनी निर्दयीपणे हत्या केली. शनिवारी रात्री उद्यानात बोलावून सहा जणांनी ऑक्सिजन पार्क (Oxygen Park Pune) परिसरात त्याला गाठत तब्बल 29 वार केले. घडलेली घटना इतकी भयंकर होती की पोलिसांनाही काही काळ मृतदेह शोधून काढण्यासाठी धावपळ करावी लागली.
या प्रकरणात तक्रार केशव बबन वाघमारे (Keshav Waghmare) यांनी दिली असून चंदननगर पोलिसांनी रात्रीतून तपास झपाट्याने पूर्ण करून आरोपींना पकडले. या खुनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून प्रथमेश शंकर दारकू, यश रवींद्र गायकवाड (Yash Gaikwad ), जानकीराम परशुराम वाघमारे (Jankiram), महादेव पांडुरंग गंगासागरे (Mahadev Gangasagare), बालाजी आनंद आणि करण निवृत्ती सरवदे (Karan Saravade) या सहा तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासोबतच सहा अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी पकडून चौकशी सुरू केली आहे.
वाद पेटला कसा?
लखनच्या मावसबहिणीशी आरोपी यशचे प्रेमसंबंध होते. हे नातं मुलीच्या कुटुंबाला पसंत नव्हतं. त्यातूनच लखन यशला दूर राहण्याचा सल्ला देत असे. 6 डिसेंबरच्या संध्याकाळी या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यशनं मुद्दाम लखनला ‘वाद मिटवूया’ म्हणून उद्यानात बोलावलं. परंतु भेटताच तिघांनी मिळून त्याच्यावर धारदार हत्यारांनी सलग वार केले आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी रक्ताचाच सडा
हत्येनंतर आरोपी पळून गेले. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले पण मृतदेह दिसत नव्हता फक्त रक्ताचे मोठे डाग. तपास वाढवताना पोलिसांनी परिसरातील खासगी रुग्णालयांशी संपर्क केला आणि लखनला गंभीर अवस्थेत एका रुग्णालयात दाखल केल्याचं समोर आलं. मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाला होता.
सहा तासांत आरोपींना पकडून पोलिसांनी केली मोठी कामगिरी
या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनावणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. रात्रीपासून सुरू केलेल्या शोधमोहीमेत चंदननगर पोलिसांनी सहा तासांत आरोपींचा ठावठिकाणा काढून त्यांना ताब्यात घेतलं. परिसरातील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि चौकशी यांच्या आधारे तपास वेगानं पुढे नेण्यात आला.






