Mangalprabhat Lodha: मुंबईत भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी जोरदार भाषण करत पुन्हा एकदा पक्षाच्या विजयाचा संकल्प व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत केवळ अमित साटम (Amit Satam) किंवा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याची समान जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास “आपली कॉलरही ताठ होईल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यात बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी महापौरपदासाठी भाजपाने ठोस दावा करणार असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, अमित साटम मेहनती आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजप संघटना अधिक बळकट झाली आहे. “आपली सेना भाजप आहे आणि सेनापती अमित साटम आहेत. महापौर आपलाच बसवायचा आणि ही धार्मिक जबाबदारी जशी निभावतो, तशीच पूर्ण करूयात,” असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रावर
यानंतर भाषणाचा सूर बदलत लोढा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले की, फडणवीस म्हणजे “देवाभाऊंची अनेक रूपं.” ते केवळ भाजप चालवतात असं नाही, तर “महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हेही अनेक वेळा त्यांच्याच इशाऱ्यावर ठरतं.” नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते राज्याचे नेतृत्व फडणवीसांनी केलेल्या कामांचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला.
राजकारण कधी आवडतं, कधी नाही, तरीही संकटात लोकांसाठी धावून येण्याची त्यांची वृत्ती ही त्यांची मोठी ताकद असल्याचे लोढा यांनी सांगितले.
अमित साटमांचा दावा
मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनीही या मेळाव्यात महत्त्वाचं भाषण केले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण केल्यानंतर चार मोठ्या शहरांत सर्व्हे झाला आणि 70 टक्के नागरिक सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी असल्याचा निष्कर्ष निघाला.
समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी, मोतीलाल नगर पुनर्विकास या सर्व प्रकल्पांनी मुंबईचा चेहरामोहरा बदलला असल्याचा त्यांनी दावा केला. मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मेट्रो नेटवर्कशी जोडली जात असून कोस्टल रोडसाठी ऑस्ट्रेलियातील प्रकल्पांशी तुलना केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईकरांची अपेक्षा वाढली आहे आणि त्यांना सुरक्षित, विकसित शहर देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.






