Pune Land Scam : पुण्यातील जमीन विक्री गैरव्यवहाराने पुन्हा एकदा राज्यात राजकीय ताप वाढलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांच्या मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित कोरेगाव पार्क येथील भूमीखरेदी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रमुख अधिकारपत्रधारक शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) हिला अटक करण्यात आली. पुणे पोलिस (Pune Police) यांच्याकडून झालेल्या तपासात तिचा वाटा स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली असून कंपनीचे भागीदार दिग्विजय यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
या संपूर्ण घडामोडींमध्ये विरोधकांनी मोठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांनी थेट राज्य सरकारलाच जाब विचारत सलग चार प्रश्न उपस्थित केले. “जमीन देणारा तुरुंगात, पण घेणाऱ्यावर कारवाई नाही?”, “पार्थ पवारांना मुदतवाढ किती दिवस?”, “१ टक्का भागधारक दिग्विजय स्वतःच्या मर्जीने सायनिंग अथॉरिटी कसे?”, आणि “स्टँप ड्युटी माफी करणाऱ्यांची नावे कधी जाहीर करणार?” असे प्रश्न दानवे यांनी सोशल मीडियावरून राज्य सरकारपुढे ठेवले.
मुंढवा जमीन प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी
मुंढवा येथील तब्बल 1800 कोटींच्या जमिनीच्या खरेदी व्यवहारात ‘अमेडिया’ कंपनीवर 300 कोटींमध्ये डील निश्चित करून फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी जमा केल्याचा आरोप आहे. उद्योग संचालनालयाने अवघ्या 48 तासांत स्टँप ड्युटी माफ केली आणि हा व्यवहार फक्त 27 दिवसांत पूर्ण झाला. माध्यमांमधून तक्रार समोर आल्यानंतर अजित पवारांनी व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली होती.
तपासानुसार जमिनीवरील पॉवर ऑफ अॅटर्नी शीतल तेजवानीकडे होती. पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली असता, ती मूळ कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ करत असल्याचं उघड झालं. सरकारी जमीन चुकीच्या माहितीच्या आधारे खासगी कंपनीकडे हस्तांतरित झाल्याचा निष्कर्ष आल्यानंतर अखेर तिची अटक झाली. मात्र, या प्रकरणात पार्थ पवारांवर अजूनही कारवाई न झाल्याने विरोधकांनी हा मुद्दा हातात घेत सरकारला घेरायला सुरुवात केली आहे.






