Raj Thackeray: नाशिकमध्ये सरकार झाडं तोडणार, राज ठाकरेंचा संताप; वृक्षतोडीविरोधात मनसे मैदानात, म्हणाले…

Raj Thackeray : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक (Nashik) मध्ये जवळपास दोन हजार झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर नुसतेच नागरिक नाही, तर पर्यावरण संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही विरोध करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या लढ्यात स्वतः उडी घेतली असून वृक्षतोडी विरोधात लढणाऱ्या नाशिककरांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

राज ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयावर संशय व्यक्त करत म्हटले की, “कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडं तोडणे, साधूंच्या नावाने जमीन सपाट करणे, आणि नंतर ती जमीन उद्योगपतींच्या हातात जाणे यामागे काहीतरी वेगळा हेतू असावा असा संशय मला आहे.” त्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे स्पष्ट केले की, सध्या राज्यातील काही सत्ताधारी मंत्र्यांचा, आमदारांचा आणि त्यांच्याशी निगडीत वर्तुळांचा जमिनींचा वापर मुख्यतः उद्योगपतींच्या फायद्यासाठी होत आहे.

राज ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, “कुंभमेळ्यासाठी १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण नाशिकमध्ये कुंभमेळा यापूर्वीही झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या महापालिकेत असताना आम्ही शहरात भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळी कोणतीही झाडं तोडण्याची गरज नव्हती. मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत?”

राज ठाकरे यांनी नाशिककरांना आवाहन केले की, “तुम्ही ठाम रहा. झाडं तोडल्यास दुसरीकडे लावली जातील, असे पोकळ आश्वासन सरकार देऊ नये. जर खरंच दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा असेल, तर तिथेच साधुग्राम करा. झाडं उद्योगपतींच्या फायद्यासाठी वापरू नका. नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. यामध्ये राजकारण नाही; निवडणुकांनंतर देखील हा विरोध कायम राहील.”