Dharmendra : बॉलीवूडच्या सुवर्णकाळातील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या सोमवारी झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने चाहत्यांपासून सहकलाकारांपर्यंत सर्वत्र दुःखाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मुंबईतील हेमामालिनी (Hema Malini) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि शोकसंवेदना व्यक्त केल्या.
हेमामालिनी यांच्या घरी झालेल्या या भेटीदरम्यान सिडकोचे माजी चेअरमन प्रमोद हिंदुराव (Pramod Hindurao) देखील उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर राजकीय आणि कलाविश्वातील अनेक मान्यवरांकडून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची तब्येत ढासळलेली होती. मुंबईतील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी (Breach Candy) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुन्हा घरी हलवण्यात आले आणि त्यांच्यावर घरातच उपचार सुरू होते.
8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंग देओल (Dharam Singh Deol) होते. वडील शिक्षक असल्याने साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. अभिनयाची ओढ असल्याने त्यांनी चित्रपटक्षेत्राची वाट धरली आणि 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 1970 मध्ये त्यांना जगातील सर्वात देखणा पुरुष हा सन्मान मिळाला होता. अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी, राजकारण, तसेच त्यांच्या जगभरातील चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.