Thane MNS Video: ठाणे (Thane) शहरातील पोखरण रोड नं. २ व गांधी नगर भागात दोन दिवसांपूर्वी रात्री घडलेल्या प्रकारानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. दारूच्या नशेत एक परप्रांतीय रिक्षाचालक मराठी तरुणाशी वाद घालताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) व जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्याबद्दल अत्यंत अयोग्य व अश्लील शब्दांत बोलताना दिसला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच वातावरण पेटलं आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित रिक्षाचालकाला चोप दिल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणातील आरोपीचं नाव शैलेंद्र संतोष यादव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी. छोट्याशा वादातून निर्माण झालेल्या संतापानं त्याने मराठी तरुणाला शिवीगाळ केली आणि त्यानंतर मनसे नेत्यांबाबत घाणेरडे अपशब्द काढले. परंतु व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फिरताच तो भानावर आला. दुसऱ्याच दिवशी थेट पोलिस ठाण्यात जाऊन त्यानं राज ठाकरे व अविनाश जाधव यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल हात जोडून माफी मागितली, एवढंच नव्हे तर कान धरून उठाबशाही काढून दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माफी आणि उठाबशा
गांधीनगर परिसरात झालेल्या या घटनेनंतर शैलेंद्र यादवने स्वतःचा पश्चात्ताप व्यक्त करणारा व्हिडिओही शेअर केला. त्यात तो म्हणतो—तो रिक्षा लावण्यावरून एका अनोळखी व्यक्तीशी वादात अडकला आणि त्यातून हाताबुक्की व शिवीगाळ झाली. नशेच्या अवस्थेत असताना त्याच्या तोंडातून मनसे नेत्यांबद्दल अपमानास्पद शब्द निघाले, पण त्याबद्दल मनापासून माफी मागतो आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही असं आश्वासनही देतो.
नेमकं घडलं तरी काय?
रात्रीच्या वेळेस रिक्षा लावण्यावरून झालेला वाद परप्रांतीय तरुणांनी उचलून धरला. काही तरुणांनी मराठी तरुणाला धमकावत हुसकावून लावलं. यावेळी शैलेंद्र यादवने “ये ठाणे का गांधीनगर है, यहां भैय्या का राज चलता है” अशा स्वरूपाचे शब्द वापरत मराठी समाजाविरोधात उद्धट भूमिका घेतली. तसेच मनसे नेत्यांना मारहाण करण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.
यामुळे मनसे आक्रमक झाली आणि मनसैनिकांनी थेट पोलीस ठाण्यात आरोपीचा “महाप्रसाद” काढत त्याला चोप दिल्याची माहिती समोर आली. अविनाश जाधव यांनीही याबाबत प्रतिक्रिया देत, राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्याला महाराष्ट्र सैनिक कधीही सोडणार नाहीत, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.