Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा स्पष्ट करण्यात आली. सूत्रांनुसार, भाजप (BJP) व्यतिरिक्त इतर कुणासोबत युती करण्यास पवारांनी हरकत नसल्याचे सांगितले. समाजवादी पक्ष अथवा मनसेसोबत देखील हातमिळवणी करता येऊ शकते, अशी एकसंध भूमिका राष्ट्रवादीने आजच्या बैठकीत मांडली.
काँग्रेसच्या प्रस्तावाला शरद पवारांचा नकार
गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन “महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढावेत. मात्र मनसेसोबत आम्ही जाणार नाही”अशी भूमिका स्पष्ट केली होती. शरद पवारांनी यावर विचार करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यामुळे पवार कोणाची बाजू घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अखेरीस पवारांनी काँग्रेसच्या मनसेविरोधी भूमिकेला न जुमानता ठाकरे बंधूंसोबत जाण्याचा मार्ग निवडल्याचे स्पष्ट झाले.
काँग्रेसमध्येच मनसेविषयी मतभेद उफाळले
मनसेसोबत जायचं की नाही, या प्रश्नावर काँग्रेसमध्येच मोठा विसंवाद दिसून आला. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी “भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे; मनसेसोबतही चर्चा होऊ शकते” असा सकारात्मक संकेत दिला.
पण मुंबई काँग्रेसच्या प्रमुख वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी त्यांचा हा प्रस्ताव थेट नाकारला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “मारझोड करणाऱ्या पक्षांसोबत आमची युती शक्य नाही. आमची भूमिका जोडण्याची आहे, तोडण्याची नाही. उद्धव ठाकरे त्यांचा निर्णय घेतील, पण मुंबई काँग्रेसचा निर्णय आम्ही घेतलाय.” काँग्रेसमधील या परस्परविरोधी भूमिका लक्षात घेता, शरद पवारांनी त्यांच्यासोबत न जाता ठाकरे-बंधूंच्या सहकार्याचे संकेत देत राजकीय समिकरणे बदलून टाकली.