Share

Navale Bridge Accident : नवले पूल परिसरातील दुर्घटना थांबवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी घेतली गडकरींची भेट ; महत्त्वाच्या उपाययोजना ठरल्या

Navale Bridge Accident : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात सतत घडणाऱ्या अपघातांना आळा बसावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी नवी दिल्लीत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान उच्च वेग, तीव्र उतार आणि वाहतूक वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर तातडीच्या तसेच दूरगामी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या परिसरात यापूर्वी काही सुधारणा केल्या असल्या, तरी अलीकडे झालेले अपघात पाहता नव्या उपाययोजना तत्काळ अमलात आणण्याची गरज असल्याचं मोहोळ यांनी गडकरींसमोर मांडलं.

मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत निश्चित केलेल्या सुरक्षा उपाययोजनांना केंद्राच्या पातळीवर आणखी गती मिळावी, यासाठी त्यांनी गडकरींसोबत सविस्तर चर्चा केली. यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, नवले पूल परिसरातील अपघात कमी करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

नवले पूल परिसरातील भीषण अपघातानंतर वाढली चिंता

मागील गुरुवारी सायंकाळी नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले. मुंबई–बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ एका कंटेनरचे नियंत्रण सुटून त्याने समोर जाणाऱ्या वाहनांवर सलग धडक दिली. क्षणार्धात आठ ते दहा वाहने चिरडली गेली, त्यातील एका कारचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन ती पेट घेतली. या आगीत कारमधील प्रवाशांसह एकूण आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सायंकाळी साधारण सव्वासहाच्या सुमारास साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचा ताबा चालकाच्या हातातून निसटला. तीव्र उतारावर वेग वाढल्याने कंटेनरने रस्त्यातील अनेक वाहनांना झपाट्याने धडक दिली. अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या व्हिडिओमधून घटनेची तीव्रता स्पष्ट दिसते. तीन जळणारी वाहने काही अंतरावर जाऊन थांबली, तेव्हा पर्यंत परिसरात धुराचे वलय पसरले होते.

या अपघातात पाच कार प्रवासी, कंटेनरचालक आणि त्याच्यासोबतचा क्लिनर असे एकूण आठ जण ठार झाले. मृतांमध्ये दोन महिला, एक लहान बाळ आणि चार पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 20 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. वाहनांचे अवशेष हटवण्यासाठी कटर, क्रेन आणि बचाव पथकांना मोठा संघर्ष करावा लागला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now