Cold Wave : सकाळ होताच अंगात शिरणारा गारवा आणि रात्री तर थेट हाडं गोठवणारी हवा… महाराष्ट्रात आता अशी कडाक्याची थंडी सुरू झाली आहे की स्वेटर, शाली आणि शेकोटीही काही ठिकाणी अपुरी भासत आहे. हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास (Umashankar Das) यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्रालगतच्या काही राज्यांमध्ये 18-19 नोव्हेंबर दरम्यान अति तीव्र थंडीची लाट (Cold Wave) धडकणार आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील अनेक भागांवर जाणवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तरेकडून येणारे थंडगार वारे 18 ते 21 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र थंडीनं गारठवणार आहेत. याच कालावधीत विदर्भातही तापमान झपाट्याने खाली उतरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यानंतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 22 नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त होते. मागील 24 तासांमध्ये विदर्भातील अनेक भागांनी कडाक्याची थंडी अनुभवली असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात कोकण वगळता अन्य सर्व जिल्ह्यांत तापमान 4 ते 6 डिग्री पर्यंत घसरण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येणारी थंडी अधिक तीव्र होणार असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढील 48 तास धोक्याचे
हवामान विभागानुसार काही जिल्ह्यांमध्ये तापमानात 6 डिग्रीपेक्षा जास्त घट पुढील 48 तासांत नोंदवली जाऊ शकते. त्यामुळे केवळ स्वेटर, शेकोटी पुरेशे ठरणार नसून हिटरचा वापर अनिवार्य ठरेल अशी भीती व्यक्त होते. डिसेंबर महिन्यात थंडी आणखी वाढण्याची चिन्हं असून यावेळी ला नीना चा परिणाम भारतभर स्पष्टपणे दिसू शकतो.
विदर्भात गारठा वाढला
विदर्भातील नागपूर (Nagpur City) शहरात मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 27°C आणि किमान तापमान 12°C इतकं खाली जाण्याचा अंदाज आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट कायम आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी धारदार गारवा जाणवेल असं स्पष्टपणे दिसून येत आहे.
राज्यात 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट
18 नोव्हेंबर रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागातील नागरिकांनी गरम कपडे, ब्लँकेट आणि आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
थंडी फेब्रुवारीपर्यंत कायम
हवामान विभागाचा प्राथमिक अंदाज सांगतो की यंदाची थंडी फेब्रुवारीपर्यंत कायम राहू शकते. मागील वर्षाच्या तुलनेत मुंबईसह राज्यभर यंदा अधिक गारवा जाणवत आहे. दरम्यान, दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.






