Eknath Shinde : राजकीय मतभेद विसरून आपुलकीचा संदेश देत, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी केली. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन करत, शिंदेंनी “संजयजींना माझ्या शुभेच्छा सांगा, लवकर बरे व्हा” असे मनापासून सांगितले. या फोन कॉलचा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीच्या हाती लागल्याने, सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्येतीची तक्रार झाल्यानंतर मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी हातात पुन्हा पेन घेतलेला फोटो शेअर करत “माझी लेखनी चाललीच पाहिजे” असा संदेश दिला होता. या पोस्टमुळे त्यांच्या चाहत्यांसोबतच राजकीय वर्तुळातही हलकासा दिलासा निर्माण झाला होता.
दरम्यान, संजय राऊत यांनी स्वतःच्या प्रकृतीमुळे दोन महिन्यांसाठी सामाजिक आणि राजकीय जीवनातून विश्रांती घेणार असल्याचं ‘एक्स’ (X) या सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. या पोस्टनंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही “काळजी घे संजय काका! तू प्रत्येक संकटावर विजय मिळवतोस. आत्ताही तेच होईल,” असा आत्मीयतेचा संदेश दिला होता. त्यावर राऊतांनी “धन्यवाद my dear Aaditya” अशी थेट प्रतिक्रिया दिली होती.
याच पार्श्वभूमीवर, राजकारणातील विरोधी गटातील असतानाही एकनाथ शिंदेंनी दाखवलेली ही काळजी अनेकांच्या मनाला भिडली आहे. त्यांच्या या फोनवरून राजकीय सीमारेषा विसरून मानवी संबंधांची ऊब टिकून असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही एका सभेतून राऊत यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली होती. त्यामुळे, विरोधकांकडून येणारा हा ‘काळजीचा फोन’ राजकारणात एक वेगळं वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.






