Bacchu Kadu : कोकणातील राजकारणात प्रहारची धडक! बच्चू कडूंची रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत एंट्री, निवडणूक आयोगावरही संतापाचा सूर

Bacchu Kadu : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 246 नगरपरिषदां आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातील राजकारणात एक नवी हलचल झाली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचा कोकणात प्रवेश

प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं की, “रत्नागिरी नगरपरिषदेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष ५ ते ६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे.” त्यांच्या या घोषणेमुळे कोकणातील राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील अनेक पक्ष अद्याप महायुती (MahaYuti) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यासोबत लढायचं की स्वतंत्र उमेदवार उभे करायचे, याचा निर्णय घेत नाहीत. मात्र प्रहार पक्षाने स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडल्याचं स्पष्ट केलं आहे.

निवडणूक प्रक्रियेवर बच्चू कडूंचा संताप

बच्चू कडू यांनी केवळ निवडणुकीची घोषणा केली नाही, तर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीवरही रोष व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की, “आज मत कुणाला दिलं हे मतदारालाच माहीत राहत नाही. ईव्हीएम मशीनमध्ये पारदर्शकता नाही. ही मशीन नामर्दाची अवलाद आहे, यातून मतांची चोरी होते.”

ते पुढे म्हणाले, “संविधानाने नागरिकांना अधिकार दिला आहे की आपण कोणाला मत दिलं हे जाणून घ्यावं. पण आज तो अधिकार कागदावरच राहिला आहे. निवडणूक आयोगाने या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. मला तर असं वाटतं की निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असावी, म्हणूनच एवढा गोंधळ सुरू आहे.” बच्चू कडूंच्या या विधानानंतर पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

कोकणात प्रहारचा नवा प्रयोग

कोकणातील राजकारणात पारंपरिक पक्षांचा प्रभाव असताना, प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रवेशामुळे नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील (Ratnagiri) मतदारवर्गावर बच्चू कडू यांच्या आक्रमक आणि थेट भाषणशैलीचा किती प्रभाव पडतो, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.